Anand Mahindra : नवीन वर्ष २०२६ च्या सुरुवातीला महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी देशवासीयांना शुभेच्छा देतानाच, आर्टिफिशियल इंटेलिजेंसकडे पाहण्याचा एक नवा आणि सकारात्मक दृष्टिकोन मांडला आहे. "एआय कडे धोका म्हणून न पाहता, ती एक संधी आणि मानवी हातांना मदत करणारी तंत्रज्ञान प्रणाली म्हणून पाहायला हवे," असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. एआयमुळे केवळ तांत्रिक कौशल्येच नव्हे, तर हाताने काम करण्याच्या कौशल्यांचे महत्त्वही वाढणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
'ब्लू-कॉलर' कामाला मिळणार 'व्हाईट-कॉलर'चा दर्जा
आनंद महिंद्रा यांच्या मते, एआय उद्योगात अडचणी आणेल हा समज चुकीचा असून, ते प्रगतीचा वेग वाढवणारे साधन ठरेल. एआय आणि स्मार्ट सिस्टम्समुळे कामाचे स्वरूप बदलेल. यामुळे पारंपारिक मॅन्युअल किंवा 'ब्लू-कॉलर' काम करणाऱ्यांचे महत्त्व 'व्हाईट-कॉलर' कर्मचाऱ्यांइतकेच वाढू शकते. जेव्हा तंत्रज्ञान मानवी हातांच्या कौशल्यांना चालना देते, तेव्हा हे कौशल्य ऑफिसमधील पारंपारिक कामापेक्षा अधिक मौल्यवान ठरू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
भारतासाठी 'ब्रेन गेन'ची सुवर्णसंधी
जागतिक स्तरावर टॅलेंटच्या हालचालींबाबत भाष्य करताना महिंद्रा म्हणाले की, पाश्चात्य देशांमधील कडक व्हिसा नियम आणि शैक्षणिक धोरणांमधील बदलांमुळे भारतातून बाहेर जाणारे 'टॅलेंट' आता देशातच राहू शकते. प्रतिभा बाहेर जाण्याऐवजी, आता भारतात 'ब्रेन गेन'ची स्थिती निर्माण होऊ शकते. भारत आता केवळ 'सपोर्ट फंक्शन'पर्यंत मर्यादित न राहता, संशोधन आणि ज्ञानावर आधारित कामात जागतिक केंद्र बनेल. भारतातील 'ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स'चा विस्तार हा आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचा भारताच्या क्षमतेवर असलेल्या विश्वासाचेच प्रतीक आहे.
शिक्षण पद्धतीत बदलाची आवश्यकता
एआयच्या युगात टिकून राहण्यासाठी भारताने आपली शिक्षण पद्धती अधिक मजबूत करणे गरजेचे असल्याचे महिंद्रा यांनी सांगितले. एआय आणि नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेणारे मनुष्यबळ तयार करण्यावर भर द्यायला हवा. तांत्रिक बदल आणि जागतिक राजकारणातील अनिश्चितता यांकडे धोका म्हणून न पाहता, विकासाच्या नवीन वाटा शोधण्याची हीच योग्य वेळ आहे.
वाचा - विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
थोडक्यात सांगायचे तर, एआय माणसाला कमकुवत करणार नाही, तर त्याच्या कौशल्यांना अधिक धार देईल. जागतिक प्रतिभेने आता भारतात परतण्याची वेळ आली असून, हे भारतासाठी प्रगतीचे नवीन दरवाजे उघडणारे ठरेल, असा आशावाद आनंद महिंद्रा यांनी व्यक्त केला आहे.
